नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- रक्षाबंधनानिमित्त भावाकडे जाणाऱ्या दोन लाडक्या बहिणीच्या पर्समधून तब्बल पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना आज दुपारच्या सुमारास नाशिकरोड बस स्थानकात घडली. यावेळी बस मधील प्रवासी सह नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून सर्वांची तपासणी करण्यात आली. मात्र काही मिळून आले नाही.
कुसुम भालेराव (रा. जेलरोड) यांच्या पर्समधून दोन तोळे वजनाचे कानातले आणि तीन हजार रोख रक्कम, तर ज्योती जेजुरकर (रा. माडसांगवी) यांच्या पर्समधून साडेतीन तोळ्यांची सोन्याची पोत असा एकूण पाच तोळ्यांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
दोन्ही महिला नाशिकहून शिर्डीकडे जाणाऱ्या मुंबई-शिर्डी बस क्रमांक MH 14LX8 891या महामंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी बस बसल्या, तेव्हा गर्दी चा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. सदर बाब नाशिकरोड बस स्थानकातून सुटल्यावर दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने महिलांनी आरडाओरडा केला.
यानंतर बस तातडीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आली व सर्व प्रवाशांची चौकशी करण्यात आली. मात्र चोरट्याचा सुगावा लागला नाही. चौकशी पूर्ण झाल्यानंतर बस शिर्डीकडे रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, बस स्थानक व प्रवासी बसमध्ये सुरक्षा उपाय वाढविण्याची मागणी होत आहे.