नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): वडनेर दुमाला गावात शुक्रवारी (८ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता भयावह घटना घडली. साडेतीन वर्षीय आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला आणि त्याला ओढत घेऊन गेला.
मुलगा अचानक घरात दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या पालकांनी शोध सुरू केला. घराच्या मागील बाजूस असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व काही अंतरावर मुलाची पॅन्ट सापडल्याने घाबरलेले पालक व ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
परिसरात चंद्रदर्शन नसल्यामुळे प्रचंड अंधार आहे, त्यामुळे शोधमोहीमेला अडथळे येत आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी युवक, तसेच डॉग स्कॉड, गुगल श्वान पथक व ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात येत आहे.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली तपास व शोध सुरू आहे. वनविभागाचे पथकही या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या वावरावर त्वरित नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.
नासिकरोड मधील आर्टिलरी सेंटर, जय भवानी रोड परिसरात गेल्या तीन दिवसापासून बिबट्याने हायदोष घातला आहे. अनेकदा रात्री मध्यरात्री व पहाटे रस्त्याने मोकाट फिरताना बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे.अनेक सीसीटीव्ही कॅमेरातही त्याची चित्रण झाले आहे.