नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : मोबाईल चोरणारी टोळी गुन्हेशाखा युनिट एकने पकडली असून, त्यांच्या ताब्यातून २५ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक ऑगस्ट रोजी अविनाश भानूदास आव्हाड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनीकडे रात्री पावणे अकरा वाजता पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीचा आयफोन चोरून ते पळून गेले.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे पथक त्याचा समांतर तपास करीत होते. आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना माहिती मिळाली की, आव्हाड यांचा मोबाईल विकी काळे, ऋतिक हिरे व शुभम इंगळे यांनी चोरला असून, ते हा मोबाईल विक्री करण्यासाठी चांदशी शिवारात नेणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी वरिल ठिकाणी सापळा रचला. हे तिघे एम.एच.०१ ई.एच.९६५४ या क्रमांकाच्या अॅक्सेस गाडीवरून चांदशी शिवारात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेले सहा मोबाईल व दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
हे ही वाचा !
त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गेल्या दोन महिन्यात एमआयडीसी अंबड,सातपूर, कामगारनगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड या भागात पायी चालणार्या इसमांच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या सोबत असलेला एक विधी संघर्षीत बालक याच्याकडे त्यांनी विक्रीसाठी मोबाईल दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्या विधीसंघर्षीत बालकाची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून १९ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. त्यांची सखोल चौकशी केली असता मौजमजा करण्यासाठी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण २५ मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार महेश साळुंके, रवींद्र आढाव, देवीदास ठाकरे, नाझीम खान पठाण,आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, सुकाम पवार, उत्तम पवार, रमेश कोळी, योगिराज गायकवाड, कैलास चव्हाण यांनी केली.