नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रियकराशी प्रेमसंबंध तोडल्याने त्याने युवतीचे लग्न तिसर्यांदा मोडल्याने 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना अमृतधाम परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की 22 वर्षीय युवतीचे भावेश वाघ (रा. विडी कामगारनगर) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याचे यापूर्वी लग्न झालेले असतानाही त्याने युवतीला अंधारात ठेवत तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले.
मयत युवतीच्या बहिणीला त्याच्याशी लग्नाबाबत समजताच तिने ही माहिती युवतीला दिली. या गोष्टीने हादरून गेल्याने युवतीने भावेशशी प्रेमसंबंध मोडले; परंतु भावेशने तिचा पिच्छा काही सोडला नाही. “तू माझ्याशी लग्न कर. नाही तर तुझे लग्न होऊ देणार नाही,” अशी धमकी तो तिला देत होता.
त्याने युवतीचे दोन ठिकाणी जमलेले लग्न दोन्ही वेळा मोडले. सध्या एका ठिकाणी तिचे लग्न ठरल्यात जमा असताना त्याने ते लग्नही मोडण्याचा प्रयत्न केला. भावेशच्या या त्रासाला ती कंटाळली होती.
अखेर तिने दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरी फॅनला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भावेश वाघ याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.