50 हजारांची लाच घेताना एका इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. शेख सुल्तान शेख अक्रम (वय 28) असे लाच घेणाऱ्या मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड मालेगाव येथील बाऊंसरचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना त्यांचे मालकीचे सर्व्हे नंबर 260 प्लॉट नंबर 22 मालेगाव येथे बांधलेल्या पत्र्याचे गोडाऊनमध्ये नवीन कर्मशिअल मीटर घ्यावयाचे होते. त्यामुळे त्यांनी MSEB यांना ऑनलाईन अर्ज करून कोटेशन भरले होते.
परंतु तक्रारदार यांना सर्वे न २६० प्लॉट न ३१, शॉप न २ देविका मल्ला, बाबा टॉवर, मालेगाव यावरील प्रलंबित वीजचोरीचे बिल रुपये १,२६,३२४.९५ तसेच कंपाऊंड बिल ४०००० रुपये भरल्याशिवाय नवीन मिटर कनेक्शन मिळणार नाही असे मालेगाव पावर सप्लाय लिमिटेड मालेगाव यांचे कार्यालयातून तक्रारदार यांना सांगण्यात आले होते.
आरोपी शेख सुल्तान शेख अक्रम यांनी सर्वे न २६० प्लॉट न ३१, शॉप न २ देविका मल्ला, बाबा टॉवर, मालेगाव हा प्लॉट तक्रारदार किंवा त्यांच्या कुटुंबीयां पैकी कोणाच्याही नावावर नसताना त्यावरील प्रलंबित बिल न भरण्याच्या बदल्यात काम करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ८०,००० रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडअंती ५०००० रुपये दिनांक २५/०८ /२०२५ रोजी स्वीकारली आहे.
दिनांक २५/०८/२०२५रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी यांना देणे करिता गेले असता, आरोपी यांनी स्वतः तक्रारदार यांच्याकडून ५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारलेली आहे.