नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सगळ्यांच्या पुढे असेल, यात तिळमात्र शंका नाही, असे सांगतानाच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला.
खा. श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचार रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. खा. श्रीकांत शिंदे हे पंचवटीतील काळाराम मंदिर येथे पोहोचताच त्यांनी प्रथम काळारामाचे दर्शन घेतले. ही प्रचार रॅली पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून सुरू झाली. यांच्यासमवेत भाऊ चौधरी, हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल या कोणतीही शंका नाही. या ठिकाणी शिवसेना उमेदवारांचा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे. मतदारही शिवसेनेला पसंती देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अकोट आणि अंबरनाथ या ठिकाणी जे काही प्रकार झाले, त्याबाबत बोलताना याबाबत भाजपने उत्तर दिले पाहिजे, असे सांगून अधिक बोलणे त्यांनी स्पष्टपणे टाळले. आम्ही नेहमीच काँग्रेसविरोधीच आहोत आणि काँग्रेसविरोधी राहिलो, आजही आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहे त्यामुळे आमचा विरोध हा काँग्रेसला कायम असेल. आम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या नगर परिषदा, नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा सगळ्यात जास्त होता. आता तो स्ट्राईक रेट राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्येदेखील सर्वांच्या पुढे असेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीप्रमाणे विकासाचे कार्य सुरू आहे. विकासाला गती मिळत आहे, त्यावर लोकांचा विश्वास आहे. विश्वासाच्या जोरावरच महानगरपालिकांच्या निकालांमध्येदेखील आम्ही सर्वप्रथम राहू, असा विश्वास व्यक्त करून, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे गेलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.