नर्सिंग केलेल्या युवतीचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू; शिलापूर गावावर शोककळा
नर्सिंग केलेल्या युवतीचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू; शिलापूर गावावर शोककळा
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शिलापूर गावची कन्या शितल बाजीराव उखार्डे (वय २१) हिचा  पाचव्या मजल्यावरून पडून झालेल्या अपघाती मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दुर्दैवाने ही घटना ऐन पोळा सणाच्या दिवशीच घडल्याने गावात आनंदाऐवजी हळहळ दाटून आली.

शितलने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून पुणे (हडपसर, म्हेळूस्के) येथील साई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून सेवा सुरू केली होती. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून ती आपल्या आईशी मोबाईलवर बोलली.

हे ही वाचा... 
काँग्रेस आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या; सापडली १२ कोटींची कॅश अन्...

काही क्षणांतच आईला पुन्हा फोन आला, पण यावेळी काळजाला चिरणारी बातमी मिळाली, की शितलचा तोल जाऊन ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली होती. डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने प्रचंड रक्तस्राव झाला आणि उपचार सुरू असतानाच या तरुणीने पोळ्याच्या दिवशी पहाटे अखेरचा श्वास घेतला.

आई-वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलीचे नर्सिंग शिक्षण पूर्ण करून तिला आपल्या पायावर उभे केले होते. वडील बाजीराव उखार्डे हॉस्पिटलमध्ये गार्ड म्हणून तर आई शेतमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात.

हे ही वाचा... 
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढत म्हणाले...

घरच्या परिस्थितीशी झुंज देत शितलने कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु नियतीच्या क्रूर फटक्याने हे स्वप्न धुळीस मिळाले. शितलच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद पुणे पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दरम्यान, शितलवर काल संध्याकाळी गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या दुर्घटनेमुळे शिलापूर गावात वातावरण शोकमग्न झाले. तरुण वयात कर्तृत्वाने पुढे चालू लागलेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group