राष्ट्रध्वज उतरवायला जिल्हा परिषद शाळा विसरली; जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिल्या कारवाईच्या सूचना
राष्ट्रध्वज उतरवायला जिल्हा परिषद शाळा विसरली; जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिल्या कारवाईच्या सूचना
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी (भास्कर सोनवणे) :- राष्ट्रध्वजाच्या वापरासाठी असलेल्या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची भारतीय ध्वज संहिता सांगते.

ध्वज संहितामध्ये ध्वजाच्या प्रदर्शनाशी संबंधित सर्व कायदे, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. या संहितेचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद शाळेने आजच्या स्वातंत्र्य दिनी फडकवलेला राष्ट्रध्वज अंधार पडण्याच्या आधी म्हणजेच सूर्यास्त होण्याच्या आधी न काढता तसाच ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे.

आज सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत हा राष्ट्रध्वज काढण्यात आलेला नव्हता. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानाजी कुंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन राष्ट्रध्वज उतरवण्यासाठी इगतपुरीच्या शिक्षण विभागाला सूचना दिल्या. यासह प्रस्तुत प्रकरणी तळेगाव जिल्हा परिषद शाळेतील संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. राष्ट्रध्वजाचा अपमान करणे किंवा त्याचा गैरवापर करणे कायद्याने गुन्हा आहे.

त्यामुळे, राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर ठेवावा आणि नियमांनुसारच त्याचा वापर करावा अशा सूचना असतांना ज्ञानाच्या क्षेत्रातील शिक्षकांकडून राष्ट्रध्वज उतरवला गेला नाही. शाळा आणि शिक्षकांवर केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे अजिबात नियंत्रण नसल्याची ह्या गंभीर घटनेने दिसून येते अशी संतप्त प्रतिक्रिया एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.

संबंधितांवर भारतीय ध्वज संहिताचे आणि ध्वजाचे अवमूल्यन केल्याबद्धल फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भगवान मधे, तानाजी कुंदे यांनी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group