नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- वडनेर दुमाला येथे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. बहिण भावांचा सण असलेल्या राखी पोर्णिमेच्या पूर्व संध्येला वडनेर दुमालातील साडेतीन वर्षाच्या आयुष भगत या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने १२ पिंजरे लावले होते.
त्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. मात्र, हा बिबट्या आयुषचा बळी घेणारा बिबट्या आहे की दुसरा याबाबत खात्री झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत कायम आहे.
दाट जंगल, लष्कराचा परिसर आणि बिबट्यांचे कमी होत चाललेले खाद्य यामुळे वडनेर, जयभवानी रोड, देवळालीगाव, देवळाली कॅम्प अशा शहरी भागात अनेक बिबटे वावरू लागले आहेत. ते कुत्रा, गाय, वासरू अशा पाळीव जनावरांबरोबरच माणसांनाही लक्ष्य करत आहे. वडनेर दुमालातही बिबट्यांची संख्या वाढली आहे. वडनेर दुमाला भागात बिबट्यांमुळे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी वडनेर दुमाला ते नाशिकमधील वनविभाग कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढला होता. त्यात आयुषचे कुटुंबदेखील सहभागी झाले होते. बिबट्या जेरबंद झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार,युवा शिवसेना नेते योगेश गाडेकर व ग्रामस्थांनी दिला होता.
वनविभागाने या परिसरात बारा पिंजरे लावले होते. त्यातील एका पिंज-यात आज एक बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सततच्या प्रयत्नांनंतर अखेर वनविभागाच्या पथकाला हे यश मिळाले. तथापी, आयुषचा बळी घेणारा बिबट्याच जेरबंद झाला का याचा खुलासा वनविभाग करू शकलेला नाही.