नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – जयभवानी रोडवरील लवटे नगर-२ परिसरात बिबट्या पाणी पिताना एका महिलेने पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असून वन विभागाकडून तत्काळ पिंजरा लावण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुमन हॉस्पिटल मागे असलेल्या राहुल लवटे यांच्या लवटे डेअरी फार्म शेजारी म्हशीच्या गोठ्यासाठी बांधलेल्या हौदावर बिबट्या पाणी पिताना त्यांच्या कामगारांच्या पत्नीने पाहिले. बिबट्याची नजर तिच्या नजरेला भिडताच तो पिल्लासह तेथून पळून गेला आणि मनपाच्या गार्डनच्या भिंतीवरून उडी मारून निघून गेला.
यानंतर परिसरातील नागरिक आणि शेतकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शोध घेतला असता लोणकर मळा येथून बिबट्या जात असल्याचे काही महिलांनी पाहिले, तर थोड्याच वेळात तो थोरात मळ्यातील विलास थोरात यांच्या घराजवळही दिसून आला. नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून लवटे यांच्या म्हशीच्या गोठ्याजवळ असलेल्या हौदाजवळ बिबट्याच्या पायांचे ठसे तपासून पाहिले. हा भाग आर्टिलरी सेंटरच्या परिसराशी जोडलेला असल्याने बिबट्या ये-जा करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी लवकरच पिंजरा लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने मळेकर आणि स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.