नाशिक :- सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्पच्या आडके नगर परिसरात घडली. वयोवृद्ध सासूच्या त्रासासह नेहमीच्याच टोमण्यांना सून वैतागली होती.
सुनेने गळा आवळल्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर देवळाली कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
सकिना गफार शेख (वय ८९, मूळ रा. बागूल नगर, विहितगाव) असे मृत सासूचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सून शबाना अब्दुल अजीज शेख (रा. साईदर्शन अपार्टमेट, आडकेनगर, देवळाली कॅम्प, नाशिक) हिला अटक केली आहे.
आडके नगरात शेख कुटुंब वास्तव्यास असून काही वर्षांपूर्वी अब्दुल अजीज यांचा विवाह शबाना सोबत झाला आहे. अजीज हे लॉन्ड्री व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची आई सकिना ही वृद्धत्वामुळे अंथरुणाला खिळून होती. अशातच त्या सून शबाना हिला वारंवार वेडवाकडं बोलून काही ना काही टोमणे मारत होत्या. त्याबरोबर शबाना हिने तिचा जेठ रौफला जेवण न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते.
दि. २ ऑगस्ट रोजी सकिना यांनी मुलगा रौफ याला ‘पान’ आणण्यास सांगितले. त्यातून सासू-सुनेतील वाद इर्षेला पोहोचला. शिवीगाळ सुरु असतानाच, शबाना हिने सकिना यांचा गळा आवळला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर शबीना व तिचा दीर रौफ यांनी उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, येथे उपचारादरम्यान, ३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. सकिना यांच्या आधारकार्डवर विहितगावचा पत्ता नमूद असल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तेव्हा तपासात एक ना अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला.
त्यातच पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाल्याने अखेर सखोल तपास सुरु झाला. तेव्हा सकीना यांचा मृत्यू अपघाती नसून खून केल्याने झाल्याचे उघड झाले. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख करीत असून न्यायालयाने शबानाला १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.