नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ट्रकने टँकरला दिलेल्या धडकेमुळे काल रात्रीपासून राहुड घाटात अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खळबळ उडाली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी राहुड घाटातून जात असताना बीपीसीएलच्या टँकरचा अपघात झाला होता. क्रेन न मिळाल्याने तो टँकर तेथेच होता. दरम्यान काल टोमॅटो वाहून नेणार्या ट्रकने या टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरात धडक दिली. या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे काल रात्री दहा वाजेच्या सुमारास या अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. ही घटना समजताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. घटनास्थळी बीपीसीएलची टिम दाखल झाली असून, सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालेगाव महानगर-पालिका, मनमाड नगरपरिषद, नांदगाव नगरपरिषद व एमएनजीएलचे चार बंब घटनास्थळी बोलविण्यात आलेले आहे. या घटनेमुळे नाशिककडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक चांदवड- मनमाडमार्गे मालेगाव-धुळे अशी वळविण्यात आली आहे.
धुळ्याकडून नाशिककडे येणारी वाहतूक मालेगाव-देवळा-सोग्रस फाटा-नाशिक अशी वळविण्यात आली आहे.
टँकरच्या गॅस गळतीचे काम जोखमीचे असल्याने या कामासाठी पूर्ण दिवस लागू शकतो, अशी माहिती चांदवड पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.