नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- सिन्नर फाटा जवळील चाडेगाव व मळे वस्तीत काल मध्यरात्री हातात कोयते घेऊन चार ते पाच चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन घरे फोडण्यात आली तर तीन ते चार घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील पोलिस यंत्रणा अनभिज्ञ राहिल्याने ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
सिन्नर फाट्यापासून तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ असलेल्या चाडेगावात मध्यरात्री १ ते २ वाजेदरम्यान हातात कोयते घेतलेले चार ते पाच चोरटे फिरताना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आले. या चोरट्यांनी गावातील रवी कारभारी नागरे आणि सुनील लक्ष्मण मानकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यानंतर त्यांनी प्रवीण नागरे यांच्या फार्महाऊसचे तीन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, तसेच सतीश तुकाराम नागरे आणि शिवाजी महादू नागरे यांच्या घरफोडीचाही प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी प्रवीण नागरे, विठ्ठल मानकर, नामदेव मानकर यांचे मोटर पंप चोरीस गेले होते, तर पंधरा दिवसांपूर्वी शरद नागरे, संपत नागरे, अरुण आव्हाड आणि हरी मानकर यांच्या मोटर पंपांचीही चोरी झाली होती. मात्र, नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कोणतीही फिर्याद नोंदवली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हे दाखल करावेत आणि संशयित चोरट्यांचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ प्रवीण नागरे यांनी केली आहे.
गावात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच पोलीस जागे होतील का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.