नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाची संततधार सुरू असून नदी, नाल्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात या पुरात अडकलेल्या 21 नागरिकांसह 2 जनावरांची आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूपपणे सुटका केली. एवढेच नव्हे, तर शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गावात अडकलेल्या नागरिकांच्याही मदतीला आपत्ती व्यवस्थापन विभाग धावून गेला आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात आज आणि उद्या (29 सप्टेंबर) रेड अलर्ट जारी केला. त्यापूर्वीच जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यात कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे येवला तालुक्यातील कोळगाव नदीच्या खालच्या बाजूस मळ्यात राहणारे 13 लोक अडकले होते.
याबाबतची माहिती स्थानिक यंत्रणेला मिळताच त्यांनी बचाव कार्यासाठी धाव घेत या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर भारम गावात अडकलेल्या दोन वयोवृद्ध नागरिकांना आपदा मित्रांच्या मदतीने स्थानिक यंत्रणेने बाहेर काढले.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे ताराबाई सुनील साळवे यांच्या दोन गायी गोदावरी नदी पात्रात अडकल्या होत्या. त्यांनाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने यंत्रणेने बाहेर काढले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर येथे 6 जण पाण्यात अडकले होते. त्यांनाही स्थानिक यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले. याबरोबरच शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 6 जण पुरात अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकासह आपदा मित्र रवाना झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.