अनिता दाते नाशिकमधील एक गुणवंत अभिनेत्री. आपल्या मेहनतीने नावारूपाला आलेली जिद्दी स्वभावाची स्पष्टवक्ती कलाकार.
खडतर परिश्रमानंतर आज अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळविला आहे. नाशिकमध्ये जन्मलेली अनिता सर्वसामान्य कुटुंबातील एक साधी मुलगी, प्रचंड मेहनती आणि जिद्दी. लहानपणापासूनच तिला नृत्य व अभिनयाची आवड होती. कुटुंबाबरोबर घरात, शाळेत शिक्षण घेताना वेळ मिळेल तेव्हा नृत्य करण्यात खूप आनंद अनुभवत असायची. बरोबर अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. वार्षिक कार्यक्रमात, स्नेहसंमेलनात हिरिरीने सहभाग घेत लहान वयातच ती आपल्यातील कलेचा ठसा उमटवू लागली. शिक्षणात मुळातच हुशार असलेली अनिता केवळ वर्गातच नव्हे तर पूर्ण संस्थेमध्ये अतिशय गुणवंत विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. शाळेतील स्नेहसंमेलनात सहभागामुळे तिची अभिनयाची रुची अधिक वाढली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने पुणे येथे ललित कला केंद्रमध्ये प्राप्त केली.
अभिनयाचे शिक्षण घेत असताना तिने केलेल्या छोट्या मोठ्या एकांकिकेमध्ये तिचे वेगळेपण जाणून घेत हळूहळू का होईना पण ती एक एक पाऊल अभिनय क्षेत्रात दमदारपणे पुढे टाकत गेली. ललित कला केंद्रात कलेचे धडे घेत असताना चिन्मय केळकर याच्याबरोबर तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले. शाळेनंतर महाविद्यालयातही छोट्या-मोठ्या एकांकिका करीत ही एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. याच कालावधीत तिने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या एकांकिका व गोदागौरवच्या स्पर्धेतही एकांकिका सादर करून बक्षिसे पटकाविली. तिच्या उमलत्या कारकिर्दीतच तिला अनेक ऑफर्स यायला लागल्या.
व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे तिचा अभिनय क्षेत्रातही वेगळेपणा दिसू लागला. टीव्हीवरील ’माझ्या नवर्याची बायको‘ मालिकेतील तिची ’राधिका सुभेदार’ची भूमिका लोकप्रिय झाली. अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगताना कोणतीही तडजोड न करता केवळ आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळेपण जपणार्या अनिता दाते - केळकर हिने नवा गडी नवराज्य, बंदिनी, अग्निहोत्र, अनामिका, चला हवा येऊ द्या आदी सिरीयल तसेच सनई चौघडे, वाळवी, मी वसंतराव, तुंबाड, गंध, जोगवा, पोपट चित्रपटात आणि किरकोळ नवरे, बाई गं कमालच झाली, महासागर, सिगारेट, फक्त हलका फुलका, एका लग्नाची तिसरी गोष्ट अशा नाटकांमध्येही काम करीत अभिनय क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवला आहे. मॉडेल म्हणून सुद्धा ती ओळखली जाते.
ललित कला केंद्रात झालेल्या ओळखीनंतर पुढे चिन्मय केळकर यांच्याशी तिने विवाह केला. अनिताची लहानपणापासूनची अभिनयाची प्रचंड तिने चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवीत पूर्णत्वास नेली आहे. तिच्या अभिनयामुळे तिला राणी मुखर्जी या प्रसिद्ध अभिनेत्री समवेत हिंदी चित्रपटात करण्याची संधी मिळाली.
मनातील स्वप्न व ध्येय पूर्ण करण्यासाठी झटणारी अनिता आज सिनेसृष्टीमध्ये वेगळेपण जपत आहे. तळागाळातून मोठेपणा जपत आलेली अनिता आजही जमिनीवरच आहे. एकंदरीत कारकिर्दीबद्दल बोलताना ती म्हणाली प्रत्येकाच्या जीवनात हसणे दुखणे योग्य प्रमाणात हवे असते, त्याचप्रमाणे जगताना भय देखील हवे असते. त्याचा समतोल साधतच माणूस म्हणून आपण तयार होत असतो.