नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) – जय भवानी रोड परिसरात संध्याकाळच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वृंदावन पार्क, लवटे नगर – १ येथे राहणारे जितू वराडे हे इमारतीच्या पायऱ्या उतरत असताना समोर अचानक बिबट्या आल्याने क्षणभर घाबरले. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी झपाट्याने पळ काढून आपला जीव वाचवला. बिबट्याने काही अंतर त्यांचा पाठलाग केला, पण नंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.
ही घटना त्या परिसरात वाढत्या बिबट्याच्या वावराची पुनरावृत्ती ठरली आहे. ८ सप्टेंबर रोजी लवटे नगर – २ येथे राहणारे राहुल लवटे यांच्या लवटे डेअरीजवळील हौदात बिबट्या पाणी पित असताना एका महिलेला दिसला होता.
त्यानंतर हा बिबट्या श्री भवानी मंदिर परिसरात तसेच लवटे नगर – १ मधील काही भागात दर्शन देत असल्याची नोंद झाली होती, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आर्टिलरी सेंटरच्या कुंपणालगत असलेल्या भागातून बिबट्या जय भवानी रोडवरील जुने मथुरा मिठाई दुकानाजवळून आतल्या रस्त्यावर सरकत वृंदावन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भिंतीच्या आडोशाने पुढे आला.
त्या वेळी वराडे आपल्या वाहनाकडे जात असताना समोर अचानक बिबट्या आला आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. वराडे यांनी क्षणाचा विलंब न लावता पळून जाणे पसंत केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी ॲड. नितीन पंडित यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली. त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला असून, बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी सकाळपासून पिंजरा लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी संध्याकाळी एकटे न फिरण्याची व सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. वन विभागही सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा