नाशिक :- संतोष काळे नामक 34 वर्षीय बिगारी इसमाच्या खुनाचा उलगडा करण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले आहे. या खुनाची मास्टरमाईंड त्याची पत्नी असल्याचे तपासात समोर आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोष काळेची बायको हिचे अहिल्यानगर येथील एका इसमा समवेत अनैतिक संबंध आहेत. संतोष काळे हा तिला नेहमी दारू पिऊन मारहाण करायचा.
अनेक वर्षे तिने हा त्रास सहन केला. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संतोष काळेचा मृतदेह गरवारे बस स्टॉपच्या मागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला.
त्या दृष्टीने त्यांनी तपासाची चक्री फिरवली. तपास करत असताना संतोषच्या पत्नीचा जबाब घेत असताना तिच्या बोलण्यात विसंगती दिसून येत होती. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. त्यांनी संतोषच्या पत्नीला पोलिसी खाक्या दाखविताच तिने खुनाची कबुली दिली.
संतोषच्या पत्नीचे अहिल्यानगर येथील प्रफुल्ल कांबळे नामक इसमाशी अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण संतोषला देखील लागलेली होती. यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. तिला नेहमी मारहाण करायचा म्हणून संतोषचा काटा काढायचा असे पत्नीने ठरविले.
अखेर प्रियकराच्या मदतीने तिने त्याला दगड डोक्यात घालून जीवे ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी संतोषच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहे.