नांदगाव (प्रतिनिधी) :- परधाडी घाट (ता.नांदगाव) परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. पत्नीला मित्राला भेटायचे सांगून घाटात नेऊन तिच्या गळ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत पीडित पत्नी गंभीर जखमी झाली असून तिचेवर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे..या प्रकरणी पीडित पत्नीने पतीविरूद्ध नांदगाव पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ला करून फरार झालेल्या पतीस नांदगाव पोलिसांनी शिताफीने तपास करत येवला येथून ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राणी गोविंद माळी (वय - 20 ) रा.कोटमगाव विठ्ठलाचे, ता. येवला, जि. नाशिक) या महिलेला घेऊन तिचा पती गोविंद माळी हा गुरुवारी ( दि.11 ) सायंकाळच्या दरम्यान मित्राला भेटायला जायचे आहे असे सांगत परधाडी घाट या परिसरात घेऊन गेला.
घाटातील निर्जन स्थळी पोहचताच त्याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकी थांबवून अचानक चाकू काढून पत्नीच्या गळ्यावर, पोटावर, पाठीवर आणि कमरेवर सपासप वार केले..या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तेथेच टाकून आरोपी पती गोविंद मोटारसायकलसह पसार झाला. दरम्यान, आज (दि.१२) सकाळच्या सुमारास परधडी गावातील काही नागरिकांना पीडिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आली.
त्यांनी तत्काळ गावातील वाहनातून तिला ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे उपचारासाठी दाखल केले.रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने पोलिसांसमोर घडलेल्या घटनेची धक्कादायक माहिती दिली. तिच्या जबाबावरून नांदगाव पोलीस ठाण्यात पती गोविंद माळी याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत गोविंद माळी यास येवल्यातून शिताफीने ताब्यात घेत गजाआड केले..सध्या पीडिता ही उपचाराधीन असून तिचेवर मालेगाव येथे उपचार सुरू आहे..घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बढे हे करीत आहे.