नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड जवळ असलेल्या भागांत दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने निर्माण झालेली भीती अद्यापही कायम असतानाच आता मुंगसाने केलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
अंगणात खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला आणि घराबाहेर ओट्यावर बसलेल्या वृद्ध महिलेला मुंगसाने चावा घेतल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या असून, दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. आर्टिलरी सेंटर रोडवरील श्री म्हसोबा महाराज मंदिरासमोर ही घटना घडली. ज्ञानेश्वर माधव गवाल हा आठ वर्षांचा मुलगा घराबाहेर खेळत असताना अचानक गवतातून आलेल्या मुंगसाने त्याच्यावर हल्ला केला.
त्याच्या पायाला दोन ठिकाणी चावा घेतल्यानंतर मुलाने आरडाओरड केल्याने मुंगूस पळून गेला. तातडीने त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दुसरी घटना 23 सप्टेंबर रोजी विहितगावमधील मथुरा रोड येथे घडली. चंद्रभागाबाई कोंडाजी कोठुळे (वय 65) घराबाहेर बसल्या असताना अचानक आलेल्या मुंगसाने त्यांच्यावर हल्ला केला. उजव्या पायाला चार ते पाच आणि डाव्या पायाला दोन ठिकाणी चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या.
आरडाओरड केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना कै. अजय संघवी चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. किरण कुमावत यांनी दिली.
बिबट्याच्या भीतीने नागरिक अजून सावरलेले नसतानाच आता मुंगसाच्या हल्ल्यांनी चिंता वाढवली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.