लासलगाव : – सोमवारी मध्यरात्री चांदवड व निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिव नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.
लासलगाव-येवला मार्गावरील शिव नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी तात्पुरत्या पर्यायी रस्त्याचा वापर सुरू होता. परंतु अचानक पुराचे पाणी वाढल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला.
दरम्यान, या पूरपाण्यातून काही नागरिक ये-जा करत असताना एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकला व वाहून जाण्याची वेळ आली. मात्र तेथील ब्राम्हणगाव-विंचूर गावाचे पोलिस पाटील विकास खुडे व त्यांच्या साथीदाराने तत्परता दाखवत या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. या धाडसामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. पण रस्त्यावर पाणी असल्याने नागरिकांनी पाणी असल्यामुळे येथून ये जा करू नये असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे
पूर पाण्याचा जोर वाढल्याने पर्यायी रस्त्यावरही पाणी आले. त्यामुळे वेळापूर, आंबेगाव, सोमठाणा देश, निळखेडे, पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांना लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणण्यासाठी मोठी गैरसोय झाली.