नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) – नाशिक रोड परिसरात अज्ञात प्रेमी युगलाने मुंबई–हावडा एक्सप्रेस समोर येत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी पहाटे सुमारे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान जेलरोड पवारवाडीच्या पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ घडली. नाशिक रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक तपासात असे समोर आले की, मृत मुलगा अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असून सडपातळ शरीरयष्टीचा आहे. त्याच्या अंगावर काळ्या रंगाची कार्गो पॅन्ट आणि काळ्या रंगाचा हाफ शर्ट होता, तसेच पांढऱ्या रंगाचे जॅकेट आढळले. मृत मुलगी २० ते २२ वयोगटातील असून मध्यम बांध्याची आहे. तिच्या अंगावर निळ्या रंगाची लेगिंग पॅन्ट, निळ्या व पांढऱ्या चौकटींचा टॉप आणि जॅकेट होते.
घटनास्थळी मिळालेल्या खिशातील सिटीलिंक बसचे तिकीट तपासल्यावर समजले की, हे दोघे शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे फाटा येथून बसने प्रवासास निघाले होते. त्यानंतर त्यांनी रविवार कारंजा येथे उतरणे आणि नंतर नांदूर नाका मार्गे नाशिक रोडकडे जाणाऱ्या बसने प्रवास केला.
प्रवासादरम्यान त्यांनी बस चालक व वाहक यांच्याकडे पवारवाडी –जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली. त्यानंतर नऊ वाजता सैलानी बाबा चौकात उतरून त्यांनी राज राजराजेश्वरी मार्गे एकलहरेकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर थांबून रात्री दोन वाजता आत्महत्या केली.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे दोघे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आसपासच्या गावांशी संबंधित असावेत. घटनेचा अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक बडे नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप कुऱ्हाडे करत आहेत.
कुटुंबीय शोधण्याचे काम सुरू असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.