नाशिकरोडमध्ये दोन तुप विक्रेत्यांवर एफडीएचे छापे
नाशिकरोडमध्ये दोन तुप विक्रेत्यांवर एफडीएचे छापे
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने लागोपाठ छापेमारीचे सत्र सुरूच असून नाशिक रोड येथील दोन तूप उत्पादकांच्या इथे छापा मारून लाखो रुपयांचे बनावट तुप जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अशीच चालू राहणार आहे, अशी माहिती सह आयुक्त तांबोळी व सानप यांनी दिली.

दसरा, दिवाळी, सण येणार असल्याने या सणांमध्ये विविध दुध व दुग्धजन्यपदार्थ जसे की तेल, तुप व अन्य पदार्थांची प्रचंड मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात "सण महाष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा" ही मोहिम सुरु आहे. त्याअंतर्गत नागरिकांना दर्जेदार, सकस अन्न पदार्थ मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ११ सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील मे. रामदेव ट्रेडींग कंपनी, आशा नगर कॉलनी, भगवती निवास, व्यापारी बँकेजवळ,  या पेढीमध्ये कमी दर्जाचे तुप विक्रीसाठी असल्याच्या संशयावरुन अन्न व औषध प्रशासन विभागाने या पेढीची तपासणी केली. पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित तुपाचा १ नमुना घेवून उर्वरित ३१ हजार ३९० रुपये किंमतीचे ४३ लिटर तुपाचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवला आहे.

तसेच दि. १७ सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील मे. श्री स्वामीनाथ ट्रेडर्स, जयभवानी रोड, नाशिकरोड या पेढीमध्ये देखील कमी दर्जाचे तुप विक्रीसाठी असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाने या पेढीची तपासणी केली.

त्यावेळी पेढीत विनापरवाना तुप या अन्न पदार्थाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. परिणामी या पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेल्या संशयित तुपाचे २ नमुने घेवून उर्वरित १ लाख ४ हजार रुपये किमतीचे १४५ लिटर तुपाचा साठा जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवला आहे.

तीनही अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल  प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी सह आयुक्त मनिष सानप व दिनेश तांबोळी,  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात केली. अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील अन्न पदार्थ उत्पादक व विक्रेते, यांचेवर लक्ष ठेवणार असून कधीही, अन कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत.

तरी अन्न व्यवसायिकांना कळविण्यात येते की, त्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे पालन करावे. तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थासंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन तांबोळी व सानप यांनी केले आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group