नाशिक :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर प्रवासी व्यवस्थापन करण्यासाठी होल्डिंग एरिया उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
त्यानुसार आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापनासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (PHA) ची व्यवस्था करण्यासाठीच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक रोड रेल्वेस्थानकावर देखील आगामी कुंभमेळा- २०२७ दरम्यान अशा प्रकारची भाविकांची गर्दी टाळण्यासाठी दि. १७ मार्च २०२५ रोजी Permanent Holding Area उभारण्याची मागणी केली होती. त्याला मान्यता देत देशातील ७३ रेल्वेस्थानकांमध्ये आपल्या नाशिकचा समावेश करण्यात आला होता.
मंत्री छगन भुजबळ यांना त्यासाठीच्या तयारीची व प्रस्तावित कामांची माहिती देणारे दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजीचे पत्र मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई सीएसएमटीकडून नुकतेच प्राप्त झाले आहे.
त्यानुसार प्रत्येकी ५००० प्रवासी क्षमता असलेले २१०० चौ. मी.चे कायमस्वरूपी व तात्पुरता असे दोन स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहेत. दोन्हींमध्ये स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वॉशबेसिन व पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल तसेच तात्पुरता होल्डिंग एरियातील स्वच्छतागृहे पोर्टेबल असणार आहेत.
होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांसाठी तिकीट काऊंटर, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, निरीक्षणासाठी एआय आधारित कॅमेरे, प्रवाशांचे साहित्य स्कॅनर, प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी साइनेज अशा अनेक एकत्रित सुविधा उपलब्ध असणार आहेत.
तसेच एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल. तात्पुरता होल्डिंग एरिया German Hanger Type असणार असून ऐन पावसाळ्यात येणाऱ्या कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी पूरक असणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा - २०२७ मध्ये सिंहस्थानिमित्त नाशिकमध्ये पवित्र गोदावरीत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची ३ कोटींहून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे, ही संख्या २०१५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत सुमारे ५० पट अधिक आहे. नाशिक रोड हे NSG-2 श्रेणीतील रेल्वेस्थानक असून कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची ही संख्या आणखी वाढणार आहे.
कायमस्वरूपी होल्डिंग एरिया अंतर्गत सण- उत्सव काळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना ट्रेन येईपर्यंत स्टेशनबाहेरील प्रतीक्षास्थळांवर थांबवले जाणार आहे. फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या इतर विविध उपाययोजना नुसार..
प्री-तिकीट क्षेत्र: गर्दीच्या वेळी या जागेत अंदाजे २७०० प्रवासी बसू शकतील.
तिकीट क्षेत्र: प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी यात ३१०० प्रवाशांची सोय होऊ शकते.
पोस्ट तिकीट क्षेत्र: यात सुमारे १३५० प्रवासी सामावून घेऊ शकतात. यात रांगेत उभे राहणे, सुरक्षा तपासणी, साहित्य स्कॅनिंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल.
या सुविधांमुळे कुंभमेळा काळात गर्दीचे व्यवस्थापन होऊन भाविकांना सुरक्षित व सुलभपणे आपली धार्मिक यात्रा पूर्ण करता येणार आहे.