केवळ नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या अनोख्या, उल्लेखनीय कारकिर्दीमुळे गोखले एज्युकेशन सोसायटी आणखी उंचीवर पोहोचले आहे.
डॉ. दीप्ती देशपांडे या एक अत्यंत यशस्वी, प्रगल्भ आणि बहुआयामी शिक्षणतज्ज्ञ व प्रशासक असून त्यांनी चार दशकांहून अधिक कालावधित प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक तसेच प्रशासकीय कारकीर्दीचा प्रवास केला असल्यामुळे दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, सोसायटीचे सर्वेसर्वा डॉ. मो. स. गोसावी यांच्या कन्या डॉ. दीप्ती देशपांडे या नवशिक्षण आणि नवोपक्रम यातील योगदान शिक्षणक्षेत्राला नवे आयाम देत असून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ उभारीत आहेत.
डॉ. मो.स. गोसावी यांच्या निधनानंतर डॉ. दीप्ती देशपांडे यांच्यावर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची मोठी जबाबदारी आली. ही जबाबदारी त्या लिलया पार पाडत आहेत.
त्या डॉक्टर्स ऑफ फिलॉसॉफी ऑर्गनायझेशन, मुंबई, इंडियन अकॅडमी ऑफ सोशल सायन्स, इलाहाबाद आदी अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या सदस्य आहेत. अध्यापक, प्रशासक, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथेही भरीव योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आजवर बारा विद्यार्थ्यांना पीएचडी व व एम. फील पदवीस मार्गदर्शन केले आहे.
लेखन क्षेत्रातही डॉ. दीप्ती देशपांडे यांचे योगदान बहुमोल आहे. इंटरनेट अँड मार्केटिंग, मार्केटिंग मॅनेजमेंट तसेच (प्राचार्य डॉ. सुनंदाताई गोसावी यांची चरित्र कथा) अशा अनेक ग्रंथांचे त्यांनी परिपूर्ण असे लेखन केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध प्रकाशनासाठी त्यांनी 45 पेक्षा अधिक पुस्तके व विशेषांकांचे संपादन केले असून 120 हून अधिक दर्जेदार संशोधन लेख व प्रबंध प्रकाशित केले आहेत.
‘स्वयंप्रकाश’ या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मासिकाच्या त्या संपादिका असून डॉ. दीप्ती देशपांडे यांनी नवनवीन विचार व साहित्य आपल्या लेखणीद्वारे समृद्ध केले आहे. त्यांच्या ’विसगे’, ’मायक्रो फायनान्स : ए टूल फॉर वूमन एम्पॉवरमेन्ट’, ’जनसंचार माध्यम : दशा एवं दिशा’, ’वूमन एन्टरप्रिन्यूअरशिप : अॅन इंडियन पर्स्पेक्टिव्ह’ आणि ’सेक्शुअल हरॅशमेंट अॅट द वर्कप्लेस’ या चार ग्रंथांना लायब्ररी ऑफ काँग्रेस कंट्रोल नंबर (एलसीसीएन), म्हणजे लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या ऑनलाईन कॅटलॉग (ओसीएलसी) या जागतिक दर्जाच्या ग्रंथसूचीमध्ये मानांकन प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कोटक लाईफ इन्शुरन्स कडून सन 2021 मध्ये शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सन्मान, सन 2020 मधील एक्सिलंट प्रिन्सिपॉल हा राष्ट्रीय पुरस्कार, रक्त-मित्र पुरस्कार (अर्पण ब्लड बँक), आशियाई अॅडमिरेबल अचिव्हर्स अवॉर्ड, तसेच अलीकडेच बेस्ट इंडियन गोल्डन पर्सनालिटी अॅवॉर्ड, नारीशक्ती सन्मान या प्रतिष्ठित पुरस्काराने डॉ. दीप्ती देशपांडे यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचे शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यातील योगदान शिक्षण क्षेत्रात नवे आयाम देत असून पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
शब्दांकन : सुधीर कुलकर्णी