गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यांना जरब ही बसलीच पाहिजे तरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून समाज स्वास्थ्य चांगले राहते. पोलीस खाते खूप छान असून या विभागाच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम करता येते. हे विचार आहेत नाशिकच्या डॅशिंग पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांचे.
नाशिकच्या परिमंडळ 2 मधून नुकत्याच परिमंडळ 1 ला बदली झालेल्या मोनिका राऊत या मूळच्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी तालुक्यातील. प्राथमिक शिक्षण त्यांनी सातार्यातच घेतले. वडिल बँकेत नोकरीला असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत असत. यामुळे मोनिका राऊत यांचे शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झाले. बी. कॉमची पदवी घेतल्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. सुरुवातीपासूनच पोलीस विभागाचे आकर्षण असल्याने मोनिका राऊत यांनी सन 2003 मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली.
पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तरी त्या खचल्या नाहीत आणि नाऊमेदही झाल्या नाहीत. अपयश ही यशाची पहिली पायरी असते या विचारातून अपयश पचवून पुन्हा जोमाने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. दुसर्याच प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली. एमपीएससी मार्फत डीवायएसपी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची नाशिक येथे पोलीस अकॅडमी येथे ट्रेनिंगसाठी निवड झाली आणि नंतर त्या महाराष्ट्र पोलीस सेवा विभागात अधिकारी पदावर कार्यरत झाल्या. नोकरीच्या काळात आजपर्यंत त्यांनी धुळे, ठाणे, अमरावती, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यांना पोलीस उपायुक्त पदावर उत्कृष्ट काम केले आहे. पोलीस विभागात काम करणे खूपच छान आणि आनंददायी आहे. या विभागामार्फत समाजासाठी आपल्याला काम करता येते.
महिलांच्या छेडछाडीचे प्रकरण असो किंवा महिलांविषयीचे इतर गुन्हे असोत, त्याचा सखोल तपास करून पिडीतांना न्याय मिळवून देता येतो, असे त्या मानतात. सुरुवातीला नाशिकमध्ये आल्यानंतर परिमंडळ 2 ची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, त्यांच्या आक्रमक कार्य पद्धतीने गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या मागदर्शनाखाली गुन्हेगारी चांगली नियंत्रणात आली. पोलीस विभागातील अधिकारी पदावर काम करणे तसे सोपे नाही. शहरात कोणत्या वेळी काय होईल याचा नेम नाही. याशिवाय वरिष्ठांचे आणि व्हीआयपींचे दौर्यांवळी त्यांचा पोलीस बंदोबस्त, वर्षभर चालणार सण उत्सव असे एक ना अनेक व्याप असतात. अशा ही परिस्थितीत मोनिका राऊत या आपले काम सांभाळून समाजसेवाही करतात. पोलीस दलामध्ये भरती होऊ इच्छिणार्या मुलींना त्या वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.
एमपीएससीची परीक्षा कशी द्यावी, त्याची तयारी कशी असावी याबाबतचे सखोल मार्गदर्शन त्या तरुण मुलींना करीत असतात. आजपर्यंत सुमारे 100 हून अधिक मुलींना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सुमारे वीस मुली पोलीस दलात अधिकारी पदावर नियुक्त झाल्या आहेत. आपल्या समाजसेवेसाठी त्या वेळोवेळी वेळ देत असतात. याशिवाय आपले दैनंदिन कामकाजही त्या चोखपणे बजावत असतात. धुळे जिल्ह्यात कार्यरत असताना सन 2013 मध्ये झालेली जातीय दंगल त्यांनी उत्कृष्टपणे हाताळून त्यांनी दंगल आटोक्यात आणली. त्यावेळी गोळीबार करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. याशिवाय नाशिकमध्ये असताना भद्रकालीतील दंगल, सात पीर बाबा दंगल असे जोखमीचे प्रसंग त्यांनी खुबीने हाताळून शांतता प्रस्थापित केली आहे.
नाशिक येथे त्यांनी दामिनी पथक कार्यान्वित केले असून सध्या दहा पथके कार्यान्वित आहेत. वेळप्रसंगी अगदी कडक भूमिका घेणार्या मोनिका राऊत यांनी आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना तडीपार केले आहे. याशिवाय गणपती, ईद यासारखे मोठे पोलीस बंदोबस्ताचे प्रसंगही त्यांनी हाताळले असून सर्व सण उत्सव शांततेत आणि आनंदी वातावरणात साजरे झाले आहेत. पोलीस विभागात काम करताना आजपर्यंत कोणताही राजकीय दबाव आला नसल्याचे राऊत सांगतात. वीस वर्षांपूर्वी विवाह झालेल्या मोनिका राऊत यांचे पती नंदकुमार राऊत हे मंत्रालयात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांना दोन मुलं असून त्यांचे शिक्षण सुरू आहे.
प्रत्येक स्त्री ही दुर्गेचे रूप असते. त्यातील शक्ती ओळखून महिलांनी स्वतःवर आणि इतरांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे, असा कानमंत्र मोनिका राऊत यांनी नवरात्रोत्सवानिमित्ताने महिलांना दिला आहे.