शिक्षण असो, की व्यवसाय, इतकेच नव्हे, तर आजकाल सशस्त्र दलातही महिला मागे राहिलेल्या नाहीत. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली चुणूक दाखविली आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली याची प्रचीतीही अनेकांना आली आहे.
अनेक महिलांनी आपल्या घरच्या पारंपरिक व्यवसायात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळून व्यवसायाला उच्च शिखरावर पोहोचविण्याची कामगिरी केली आहे. घरातील गृहिणींची जबाबदारी सांभाळतानाच व्यवसायातही तितकेच जबाबदारपणे लक्ष घालून व्यवसायाची भरभराट केली आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हॉटेल एक्स्प्रेस इनच्या संचालिका सीमा शेलार-सोनवणे या होय.
आपली घर गृहस्थी सांभाळून सीमाताई दिवसाचा अर्धा वेळ हॉटेलच्या कामकाजासाठी देतात. हॉटेलच्या कामकाजातील बारीक-सारीक गोष्टींची त्यांना माहिती असते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महिलांना काम करण्याची सुरक्षित जागा, असा नावलौकिक हॉटेल एक्स्प्रेस इनने मिळविला आहे. याचा संपूर्ण स्टाफलाही विशेषतः महिला वर्गाला अभिमान आहे.
सीमा शेलार-सोनवणे या मूळच्या पाचोर्याच्या. त्यांचे वडील नारायण शेलार एक यशस्वी व्यावसायिक आहेत. सीमा ताईंचे प्राथमिक, माध्यमिक आणि पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील महाविद्यालयात एम. पी. एम. ची पदवी संपादन केली. सन 2005 मध्ये सीमा सोनवणे यांचा बांधकाम व्यावसायिक असलेले योगेश सोनवणे यांच्याशी विवाह झाला. आपली पदवी पूर्ण झाल्यानंतर घरातील जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली. फावल्या वेळेचा काही तरी सदुपयोग व्हावा, या हेतूनेच त्यांनी हॉटेलच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली.
हळूहळू त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला. आज हॉटेलचा कार्यभार त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. हॉटेलचे कामकाज करताना त्यांचा अगदी तळाच्या कर्मचार्यांशीही चांगला सुसंवाद असतो. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कामगारांनाही काम करताना चांगला हुरूप येतो. एकमेकांचे विचार पटत असल्याने अनेकवेळा हॉटेलचे मॅनेजर आणि इतर स्टाफही त्यांचा वेळोवेळी सल्ला घेत असतात.
त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे हॉटेल व्यवसायाची चांगलीच प्रगती झाली असून, दिवसभर हॉटेलमध्ये ग्राहकांची चहलपहल सुरू असल्याचे दिसून येते. कामगारांनाही येथे काम करताना एक वेगळाच आनंद मिळतो. व्यावसायिक वृद्धी करीत असताना समाजसेवेची आवडही सीमाताईंना स्वस्थ बसू देत नव्हती. सीएसआर योजनेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे त्या करीत असतात.
त्र्यंबक रोडवरील बाल सदन या मुलींच्या आश्रमास वर्षातून किमान दोन वेळा त्या किराणा भरून देतात. याशिवाय दिवाळीच्या काळात भेटवस्तूंसह दिवाळीचा फराळ त्या देत असतात. अंधशाळेसही त्यांची नियमित मदत असते. विभागातील अनाथ मुलांसाठीही त्या काम करीत असतात. नुकताच त्यांनी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये सुमारे 300 अनाथ मुलांचा मेळावा घेतला होता. या दिवसभराच्या कार्यक्रमातून मुलांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहणारा होता.
हॉटेलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही त्या आयोजित करीत असतात. नुकताच स्वच्छतेविषयीचा प्रशिक्षण वर्ग त्यांनी पूर्ण केला. हॉटेलमधील महिला कर्मचार्यांसाठी महिलादिनी त्या सहल आयोजित करीत असतात. स्टाफला राहण्याची सोयही त्यांनी केलेली आहे. यामुळे नाशिकच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी सर्वांत सुरक्षित जागा, असा नावलौकिकही हॉटेल एक्स्प्रेस इनने मिळविला आहे.
याशिवाय नवरात्रोत्सवात एक दिवस कर्मचार्यांसाठी दांडियाचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव पण उत्साहात साजरा केला जातो. हॉटेलमध्ये काम करताना महिला कर्मचारी नेहमीच प्रसन्न असतात, असे त्या सांगतात. दसर्याच्या दिवशी पांडवलेणी येथे होणार्या कार्यक्रमाच्या वेळी हॉटेल एक्स्प्रेस इनतर्फे अन्नदानाचा कार्यक्रमही सीमाताई आयोजित करतात. अनेक बांधवांना त्याचा लाभ होत असतो.
पाथर्डी फाटा परिसरात त्यांनी रेणुका भवन नावाचे सभागृह बांधले आहे. समाजाच्या कार्यक्रमांसाठी हे सभागृह मोफत दिले जाते, तर इतरांसाठीही अल्पदरात ते उपलब्ध असते. एक प्रकारे त्यांच्या वडिलांनी हे समाजासाठी फेडलेले ऋण असल्याचे त्या मानतात. भाऊ विशाल शेलार यांना हॉटेलच्या कामात सीमाताई सहकार्य करतात. त्यांचीही सीमाताई यांच्या कामाला चांगली मदत होत असते.
एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. मुलाचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, मुलगी सध्या बारावीला आहे. त्यांची जबाबदारी त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. महिलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे. घरातील सर्व जबाबदार्या सांभाळूनच आपला उद्योग-व्यवसायही चांगल्या प्रकारे सांभाळता येतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.