नाशिक : शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचे पाणी व धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी, नंदिनी नदी व अन्य नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत सहाही विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नदीकाठच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच ठिकठिकाणी अनाउन्समेंटद्वारे "नदीकिनारी थांबू नये व सतर्क राहावे" असा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सर्वांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी सांगितले की, “सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठची पाणीपातळी वाढत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता नदीकाठच्या परिसरात राहण्याचे टाळावे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे.”
नाशिक महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिल्या "या" सूचना
नदी व नाल्याजवळ जाणे टाळावे. पावसाचे व नदीकाठच्या भागातील स्थितीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ महानगरपालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन सतत कार्यरत असून आवश्यक ते सर्व प्रतिबंधक उपाय करण्यात येत आहेत.
आज सकाळी 11 वाजता गंगापूर धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येऊन 6513 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.