नाशिक - आज सायंकाळी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे बागलाण तालुक्यात घराची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला तर मालेगावमध्ये दहा मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असून गुराखी देखील जखमी झालेला आहे. गोदावरी नदीतून 3938 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीची वाढलेली पाणी पातळी कायम आहे.
जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. तर पावसामुळे नदीपात्र ही तुडुंब भरून वाहू लागले आहे. वेधशाळेने दिलेल्या इशारानुसार जिल्ह्यामध्ये जोरदार हवा व पाऊस सुरू राहणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार हवा देखील सुरू आहे.
शनिवारी जिल्ह्यामध्ये सायंकाळी सर्व भागांमध्ये पाऊस झाला.
यामध्ये सातत्याने गंगापूर धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत 2801 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता त्यामध्ये रात्री आठ वाजता 1137 ने वाढ करून रात्री 3938 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली शनिवारी रात्री देखील कायमच आहे. इतरही धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा इतरही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पावसामुळे मालेगाव जिल्ह्यातील मळगाव या ठिकाणी मेंढ्या चारुन घराकडे जात असताना अचानक वीज कोसळल्यामुळे समाधान वाळके हा सोळा वर्षीय गुराखी जखमी झालेला आहे तर त्याच्या दहा मेंढ्या या वीज पडून मृत्यू झालेल्या आहेत.
कडेगव्हाण या ठिकाणी गोठ्यावर वीज पडल्यामुळे एका म्हशीचा देखील मृत्यू झालेला आहे. बागलाण तालुक्यातील गोरान या गावी सतत सुरू असलेल्या पावसामुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी आहे. तिला बागलाण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे इतरही भागांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.