नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- आर्टिलरी सेंटर येथील कारगिल गेट प्रवेशद्वाराजवळील सैन्य वसाहतीत दोन वर्षांचा ऋतिक गंगाधरण या बालकावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार करणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मादी बिबट्यास अखेर वन विभागाच्या पथकाने जीवाची बाजी लावत जेरबंद करण्यात यश आले आहे. अतिशय शिताफिने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि कौशल्यपूर्ण कार्यवाही करून वनाधिकाऱ्यांनी या धोकादायक बिबट्यास पकडले.
गत २३ सप्टेंबर रोजी अर्टिलरी सेंटर येथील कारगिल गेटजवळील सैन्य वसाहतीत ऋतिक गंगाधरण या दोन वर्षांच्या बालकावर त्याच्या पित्याच्या डोळ्यासमोर बिबट्याने झडप घालत हल्ला केला होता. चिमुकल्याला ओरबाडून जंगलात ओढून नेत त्याचा मृत्यू घडवून आणला होता.
दुसऱ्या दिवशी वन विभाग आणि सैन्य दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे राबविलेल्या शोधमोहीमेदरम्यान निर्जन भागात ऋतिकचा अर्धवट मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आणि बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागावर तीव्र दबाव आला. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागावर आरोप करत दोन बालकांच्या मृत्यूला वन विभाग जबाबदार असल्याचे सांगितले.
या घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने तातडीने व्यापक मोहीम सुरू केली. सैन्य दल आणि वन विभाग यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत अत्याधुनिक साहित्य आणि जिल्हाभरातील कर्मचारी यांची मोठी फौज आर्टिलरी सेंटर परिसरात तैनात करण्यात आली.
बिबट्या शिकार केल्यानंतर जागा बदलतो हे लक्षात घेऊन कारगिल गेटच्या आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या निरीक्षणादरम्यान २९ सप्टेंबर रोजी रात्री बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून नेल्याचे दृश्य कॅमेऱ्यात स्पष्ट दिसले. त्यावरून वनाधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला की बिबट्या पुन्हा त्या ठिकाणी शिकार खाण्यासाठी येईल.
माहिती मिळताच ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून वन विभागाचे पथक आणि संगमनेर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. बिबट्याने शिकारीचे उरलेले शरीर राजपूत कॉलनी परिसरात सापडले. त्या परिसरात नाला असल्याने मोठ्या परिश्रमांनंतर पलीकडे पिंजरा पोहोचवण्यात आला.
पिंजरा झाडाफुलांच्या साहाय्याने झाकण्यात आला आणि आत रेस्क्यू टीमचे दोन जवान बेशुद्धीचे इंजेक्शन घेऊन सज्ज बसवले. बिबट्या परत शिकार खाण्यासाठी येईल हे माहित असल्याने तीन वाजेच्या सुमारास तो तेथे आला. त्याच क्षणी जवानांनी बेशुद्धीचे इंजेक्शन झाडले आणि बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात पाठवण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमराज सुखवाल यांनी केलेल्या तपासणीत बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असून तो मादी जातीचा असून अंदाजे तीन ते चार वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले.
या संपूर्ण आठ दिवस चाललेल्या रेस्क्यू मोहिमेसाठी आर्टिलरी सेंटरचे नाशिकचे कमांडर ब्रिगेडियर एन.आर. पांडे (विशिष्ट सेना मेडल), कर्नल अतिक सिद्दिकी, कर्नल राजीव सिंग आणि इतर सर्व अधिकारी व जवान यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण कारवाई मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन आणि उपवनसंरक्षक (पश्चिम विभाग) सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) प्रशांत खैरनार यांच्या अचूक नियोजनानुसार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुमित निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी (फिरते पथक पेठ), वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर (फिरते पथक नाशिक), वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे (फिरते पथक वणी) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या मोहिमेत पश्चिम नाशिक वन विभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकातील वनपाल, वनरक्षक, वाहनचालक, वनमजूर, संगमनेर रेस्क्यू टीम, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, रेस्क्यू नाशिक डिव्हिजनमधील वन्यजीव पशुवैद्यक डॉ. हेमराज सुखवाल, अभिजीत महाले आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी यशस्वी आणि सुरक्षितरित्या सहभाग नोंदविला.
संपूर्ण कारवाई पश्चिम नाशिक वनविभागातील अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी, नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक, फिरते पथक नाशिक, फिरते पथक वणी, फिरते पथक पेठ, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, संगमनेर रेस्क्यू टीम आणि SGNP-WCS India यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडली. या प्रक्रियेदरम्यान परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले. ऋतिकवर हल्ला करणारा हाच मादी बिबट्या असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.