अॅड. अंजली गोपाळ पाटील या अद्वितीय व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी कायद्याच्या क्षेत्रातील प्राविण्याला समाजसेवेच्या आदर्शाशी जोडून सहकार चळवळीला नव्या उंचीवर नेले आहे.
सहकार चळवळीतील महिला नेतृत्वाचा त्या भक्कम प्रकाशस्तंभ आहेत. बी. एस्सी., एम.ए., एल.एल.एम., पीएच. डी. (कायदा) अशा उच्च शैक्षणिक पात्रतेसह, त्यांनी नाशिकमध्ये मालमत्ता विषयक कायदे, वैवाहिक प्रकरणे आणि गृहनिर्माण संबंधित कायदेशीर समस्या सोडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
सन 1990 मध्ये स्थापन झालेल्या कल्याणी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या अंजलीताई यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था आज 4,500 महिला सदस्यांसह 135 कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था केवळ आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाली नाही तर सामाजिकदृष्ट्याही आदर्श उदाहरण ठरली. त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत, कर्ज आणि उद्योग संबंधित विविध योजना राबविल्या. ज्यामुळे हजारो महिलांमध्ये कुटुंबासाठी आणि समाजासाठी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण झाली. महिलांना सन्मान प्राप्त झाला आहे.
अंजलीताई पाटील यांनी सन 2005 मध्ये कल्याणी महिला सहकार प्रबोधिनी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून महिलांची कायदेशीर साक्षरता, शिक्षण आणि आरोग्याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी बहुआयामी कार्यक्रम राबविले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आर्थिक व्यवहार, कायदेशीर हक्क, सामाजिक जबाबदार्या आणि उद्यमशीलता यांचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. या उपक्रमांमुळे स्थानिक महिला आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाल्या. त्यांनी महाराष्ट्रातील युवक-युवतींमध्ये सहकारी मूल्ये रुजविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे समाजातील युवक आणि महिलांमध्ये सहकारी संस्कृतीची जाणीव निर्माण झाली.
सहकार क्षेत्र हा समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांचे जीवन सुधारण्यासाठी एकमेव प्रभावी माध्यम आहे, असा अंजलीताई यांचा दृष्टिकोन आहे.
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतात पहिली ‘सिस्टर सोसायटी’ स्थापन झाली असून, ती जागतिक पातळीवरील पतसंस्था फेडरेशनशी संलग्न आहे. सहकार उद्यमीची स्थापना करून महिला सहकारी संस्थांमधून उद्यमशीलता व आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली. त्यांचा हेतू महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा नाही तर त्यांना सन्मानपूर्वक, शिक्षित आणि स्वावलंबी जीवन जगण्यास मार्गदर्शन करणे हा आहे. त्यांनी दाखविले, की महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ आर्थिक साधने पुरेशी नाहीत, त्यांना शैक्षणिक, कायदेशीर आणि सामाजिक प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि या तीनही बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अॅड. पाटील यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सहकार संघ (एनसीयूआय) च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘आशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन’चे त्यांनी प्रतिनिधित्व केले. ज्यामुळे भारतीय सहकार चळवळीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. त्यांच्या बहुआयामी तज्ज्ञतेच्या क्षेत्रात सहकार कायदा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण विकास आराखडे, कृषी प्रगती योजना, सामुदायिक संघटना बांधणी, जलसंधारण तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय विकास यांचा समावेश आहे.
शैक्षणिक प्रसारासाठी त्यांनी ‘ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, नाशिक’ स्थापन करून शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांनी भारतातील सहकारी चळवळीमध्ये अभिनव उपक्रम राबवून महिलांना उद्यमशीलतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी उद्योग सुरू करून त्या स्वावलंबी बनल्या.
अॅड. अंजली पाटील यांचे जीवन आणि कार्य हे स्पष्ट करते, की खरे नेतृत्व हे फक्त वैयक्तिक यश मिळविण्यापुरते मर्यादित नसते!
त्यांच्या कार्यामुळे नाशिक आणि महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाला नवे आयाम मिळाले असून, सहकार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला दिशा मिळाली आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन, आगामी पिढ्या समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत राहतील आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगती साधतील.