
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आता ‘ॲक्शन मोड’ वर आले असून शुक्रवारी संध्याकाळी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 250 टवाळखोरांवर मोठी कारवाई करण्यात आली.
शहरात अल्पवयीनांसह सराईत गुन्हेगारांनी अक्षरशः डोके वर काढले असून दिवसेंदिवस खून, हाणामाऱ्या, अमली पदार्थ विक्री, चोऱ्या आणि दरोड्याचे प्रयत्न यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे एकेकाळी “यंत्रभूमी, तंत्रभूमी आणि उद्योगभूमी” म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहर आता गुन्हेगारीचे केंद्रबिंदू ठरू लागले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असून, ज्या ठाण्यांच्या हद्दीत गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे, त्या ठाण्यांतील तब्बल 12 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारीच जारी करण्यात आले.
या निर्देशांनंतर प्रत्येक पोलीस ठाण्याने गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी मोहीम सुरू केली असून, शुक्रवारी संध्याकाळी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील भागात पोलिसांची पथके रस्त्यावर उतरली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे नागरिकांमध्ये काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या टवाळखोरांना पकडून पोलीस ठाण्यात आणले.
या कारवाईत तब्बल 218 टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले, तर 20 मद्यधुंद व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलवारी करण्यात आली. आपल्या मुलांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच अनेक पालक पोलिस ठाण्यात धाव घेऊ लागले, त्यामुळे ठाण्याला अक्षरशः ‘जत्रेचे स्वरूप’ आले होते.
ही कारवाई शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे 100 कर्मचाऱ्यांची 11 पथके या कारवाईसाठी तैनात करण्यात आली होती.
यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी टवाळखोरांचे समुपदेशन करत स्पष्ट इशारा दिला की, “कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
या अति भव्य आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे शहरात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये मात्र समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या मोहीमेमुळे गुन्हेगारीवर आता वचक बसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.