
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- ओढून नेलेल्या वासरावर ताव मारण्यासाठी परतलेल्या चार ते पाच वर्षांच्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आज शनिवारी पहाटे सहा वाजता पिंपळगाव खांब येथील शिवराम नगर परिसरात ही कारवाई पार पडली.
पोपट कचरू जाधव यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला शेजारीच असलेल्या सोमनाथ बोराडे यांच्या उसाच्या मळ्यात ओढून नेले. घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीने वनविभागाला कळवले.
दुपारी सुमारे तीनच्या सुमारास वनविभागाचे मुख्य अधिकारी सुमित निर्मळ आणि अनिल आहीरराव यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. पाहणीदरम्यान उसाच्या मळ्यात अर्धवट खाल्लेलं वासरू आढळून आले. बिबट्या पुन्हा शिकार खाण्यासाठी येण्याची शक्यता गृहित धरून मृत वासराच्या जवळच पिंजरा बसवण्यात आला. पाला-पाचोळ्याने झाकलेल्या या पिंजऱ्यात डॉक्टर हेमराज आणि वैभव भोगले यांना सायंकाळी चारपासून तैनात करण्यात आले.
परिसरात शांतता ठेवण्यात आल्यानंतर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान बिबट्या पुन्हा मेलेल्या वासराच्या जवळ आला. त्या क्षणी डॉक्टर हेमराज यांनी बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन डागले. काही अंतरावर पळाल्यानंतर बिबट्या बेशुद्ध पडला. तत्काळ रेस्क्यू पथकाने त्याला पिंजऱ्यात टाकून म्हसरूळ येथील रोपवाटिका केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
यापूर्वीही आर्टिलरी सेंटरमध्ये दोन वर्षीय श्रुतीक गंगाधरण या बालकाचा जीव घेतलेल्या बिबट्याला याच पद्धतीने रेस्क्यू करून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच अनुभवाच्या आधारे वनविभागाने ही कारवाई अधिक यशस्वीपणे पूर्ण केली.
या मोहिमेत वन अधिकारी, माजी नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक केशव पोरजे, विक्रम कोठुळे, उत्तमराव जाधव, सोमनाथ जाधव, अमित जाधव, प्रभाकर बोराडे, सचिन जाधव तसेच पिंपळगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात वनविभागाच्या शिताफी आणि स्थानिकांच्या सहकार्याचे कौतुक होत आहे.