
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : दसऱ्याच्या पहाटे धोंगडे मळा, डावखर वाडी, सुभाष रोड व परिसरात ॲक्टिव्हा गाड्यांवरून फिरत कोयत्याने वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले.
दसऱ्याच्या सकाळी तीन अल्पवयीन मुलांनी तीन ॲक्टिव्हा गाड्यांवरून फिरत परिसरातील वाहनांवर कोयत्याने तोडफोड केली आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. सणाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी प्रशांत चंद्रकांत भालेराव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांनी दोन १६ वर्षीय आणि एक १७ वर्षीय मुलांना ॲक्टिव्हा गाडीसह आणि कोयत्यासारख्या शस्त्रांसह काही तासांतच ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विनोद लखन, सूरज गवळी, पंकज कर्पे, संदेश रघतावन आणि सुनील गायकवाड यांनी केली.