
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : मुंबई येथून अमरावतीकडे नेण्यात येत असलेले तब्बल ५२ तोळे सोन्याचे व ३ किलो चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगेवर एका चोरट्याने चालत्या गाडीत डल्ला मारला. मात्र, वेळ न दवडता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवत मनमाडजवळील परिसरातून चोराला पकडण्यात यश मिळवले. या कारवाईत सुमारे ५६,६८,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दादर (मुंबई) येथील सराफ व्यवसायिक प्रदीपकुमार धर्मपाल सिंह हे १० ऑक्टोबर रोजी मुंबई-हावडा मेलने अमरावती येथे सराफ व्यावसायिकांना दागिने पुरविण्यासाठी रवाना झाले होते. त्यांच्याकडे ५२ तोळे सोने आणि ३ किलो चांदी असलेली बॅग होती. मात्र, नाशिक रोड रेल्वे स्थानक आल्या नंतर त्यांच्या लक्षात आले की दागिन्यांची बॅग चोरीला गेली आहे.
तत्काळ त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक नवीन प्रताप सिंह आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, मनमाडकडे गाडी जात असताना पथकाने संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरू केली. त्याचवेळी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील राधे गज्जू बिसोने (वय ३०) हा व्यक्ती संशयाच्या जाळ्यात सापडला. त्याची चौकशी केली असता प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र कसून तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील पिशवीत चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचार ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, निरीक्षक नवीण प्रतापसिंह, सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उफाडे-पाटील, धनंजय नाईक, शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अंबिका यादव, मच्छिंद्र लांडगे, गौतम बिराडे, सुनील गडाख, सागर वर्मा, मनीष कुमार, के. के. यादव यांनी अथक मेहनत घेतली.