नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलांना मानसिक त्रास देत एका 13 वर्षीय मुलाचा विनयभंग केल्याची घटना गायकवाड मळा परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी महिलेची 13 वर्षीय व 8 वर्षीय दोन्ही मुले तिच्या पतीसोबत राहतात. त्याच घरात 34 वर्षीय महिला राहते.

ही सावत्र आई घरगुती कारणावरून कुरापत काढून वेळोवेळी मुलांना जेवण न देणे, उन्हात उभे ठेवणे अशा प्रकारचे मानसिक त्रास देऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करते. फिर्यादी महिलेच्या 13 वर्षीय मुलासमोर ती सावत्र आई घरात शर्ट घालून फिरून त्याच्याशी अश्लील भाषेत बोलते. मुलाच्या नकळत ती त्याचा व्हिडिओदेखील काढायची. एकदा हा मुलगा घरात एकटा असताना त्या महिलेने मुलाला जवळ ओढून त्याच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
हा सर्व प्रकार पाहून मुलगा घाबरून गेला होता. या त्रासाला कंटाळून त्याने चाईल्ड हेल्पलाईन कार्यालयास ऑनलाईन तक्रार केली. हा सर्व प्रकार सन 2024 पासून दि. 8 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला. या तक्रारीवरून सावत्र आई असलेल्या महिलेच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल कोरपड करीत आहेत.
तर नाशिकमध्ये विनयभंगाची आणखी एक घटना घडली आहे.
दुसऱ्या घटनेत विवाहितेचा सासरच्यांकडून विनयभंग झाला आहे. पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि. 9 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पीडित महिला राहत असलेल्या घरात तिच्या पतीने पीडितेला शिवीगाळ केली.
त्यावेळी सासूने लाथ मारून शिवीगाळ करीत सुनेला चावा घेतला. नंतर सासर्यांनी तिचा हात पिरगाळून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. दिरानेदेखील तिला शिवीगाळ केली. या सर्वांनी मिळून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात सासू, सासरे, पती व दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.