
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : गुन्हेगारीविरोधात मोहीम छेडलेल्या नाशिक पोलिसांनी आता सोशल मीडियावर गँगस्टर संस्कृती फोफावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.
"आमचंच साम्राज्य आहे, कोणी लागत नाही नादी" अशा धमकीच्या आशयाचे रॅप सॉंग आणि रील्स पोस्ट करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी नगरसेवक पवन पवार यांच्यासह चौघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पवन पवार यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.
या संदर्भात पोलीस नाईक योगेश रानडे नाशिकरोड पोलीस ठाणे ,यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संशयितांनी स्वतःचे फोटो आणि रॅप सॉंग असलेला व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला.
या व्हिडिओमधून आमचं साम्राज्य आहे, कोणी लागत नाही नादी, मोठे लोक आमच्याकडे येतात, मोजीवाले गँगस्टर अशा शब्दांतून त्यांनी नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी पवन पवार (रा. गंगादर्शन अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड), ब्रह्मानंद वाघमारे (रा. नेहरूनगर, नाशिकरोड) तसेच त्यांचे साथीदार सोहेल पठाण, तथागत आशिष वाघमारे व निलेश भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे माजी नगरसेवक पवन पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कुऱ्हाडे करीत आहेत.