
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नांदूर शिंगोटे येथे दि. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या मजुराच्या खुनाचा उलगडा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ तासांत केला.
याबाबत अधिक माहिती अशी, की दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास नांदूर शिंगोटे परिसरात राजेंद्रकुमार ऊर्फ राजनकुमार सूरज साव (वय 35) या मजुराच्या डोक्यावर उजव्या बाजूला लोखंडी शस्त्राने दुखापत करून अज्ञात इसमाने त्याचा खून केला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळासाहेब मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांनी पोलीस पथक तयार करून त्यांना तपासाबाबत सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. मयत राजेंद्रकुमार हा शेवटी कोणाला भेटला याबाबत त्यांनी माहिती घेतली. तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी अजय सुभाष गाडेकर (वय 33, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला नांदूर शिंगोटे येथून ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.
आरोपी अजय गाडेकर व मयत राजेंद्रकुमार यांच्यात वाद झाले होते. त्यात राजेंद्रकुमारने आरोपी अजय गाडेकरच्या जेवणाच्या ताटात शाम्पूचे पाणी टाकून दिले. याच राग मनात धरून त्याने राजनकुमारच्या डोक्यावर लोखंडी फावड्याने मारून गंभीर दुखापत करीत त्याला जिवे मारले. या खुनाचा कोणाला संशय येऊ नये म्हणून घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावत घराबाहेर असलेल्या पिकअप वाहनात अजयने झोपून घेतले. पुढील तपासासाठी त्याला वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.