
सातपूर - महादेववाडी परिसरात बुधवार दि.( ८ ) सकाळी घडलेल्या भीषण जाळीत दुर्घटनेतील भाजलेल्या सहापैकी दोघांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.
दाेभाडे कुटुंबातील पाच जण व अन्य एक असे सहा जण गंभीर भाजले हाेते. या घटनेतील जखमी पंकज कैलास दाभाडे व दुर्गा दाभाडे यांचा रविवारी (दि.१२) मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे महादेववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महादेववाडी येथे खोका मार्केट समोर पिंपळाच्या झाडाच्या फांदी छाटण्याचे काम सुरु हाेते. यावेळी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाने रस्त्याच्या कडेला पेट्राेल भरलेली प्लास्टीक कॅन ठेवली हाेती. या कॅनवरून चारचाकी वाहन गेल्याने त्यातील पेट्राेल उडून झालेल्या भडक्यात लता कैलास दाभाडे, कैलास दाभाडे , सोनाली राजेश गाडेकर, दुर्गा आकाश दाभाडे , भावेश आकाश दाभाडे यांच्यासह पंकज दाभाडे गंभीर भाजले हाेते.
जखमींवर प्रारंभी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालय उपचार करण्यात येऊन नंतर त्यांना मुंबईच्या केईएम हाॅस्पिटल मध्ये पाठवण्यात आले हाेते. तेथे उपचार सुरू असताना पंकज दाभाडे व दुर्गा दाभाडे यांचा मृत्यू झाला.