
सातपुर - नाईस संकुल येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व गोळीबार प्रकरणी फरारी आरोपी भूषण लोंढे यांच्या आयटीआय पुलाजवळील कांबळेवाडीतील अनाधिकृत अतिक्रमणावर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नाईस संकुल येथील ऑरा बार गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी व सिडको येथील पुष्कर बंगला संबधी दोन कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक महापालिकेने कांबळेवाडीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी लोंढे कुटुंबीयांना नोटिस दिली होती.
त्यानंतर आज महापालिकेच्या वतीने या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावरील होर्डिंग स्ट्रक्चर काढण्याचे काम सुरू होते. तसेच लोंढे यांनी उभारलेली अनधिकृत कमान यावेळी काढण्यात आली.
या कारवाईसाठी मनपाचे ५० कर्मचारी तसेच पोलिसांचा मोठ्या फौज फाटा तैनात करण्यात आला होता. तसेच ३ जेसीबी, ५ डंपर होते.