नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापूरसह मराठवाड्याला या महापुराचा मोठा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके, शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. हजारो कुटुंबे बेघर झाली असून, अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. या भीषण आणि विदारक परिस्थितीत राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला आहे.
या आपत्तीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध स्तरांतून पुढाकार घेतला जात आहे. सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे आणि देवस्थानांना देखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने मोठे पाऊल उचलले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाने पूरग्रस्तांसाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात आर्थिक मदत म्हणून ११ लक्ष रुपये माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याची घोषणा केली आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने दिलेल्या या माहितीमुळे पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू असलेल्या मदतकार्याला बळ मिळाले आहे. ११ लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टचे विश्वस्त ऍड दीपक पाटोदकर यांच्या हस्ते नाशिकचे धर्मदाय सह आयुक्त विवेक सोनुने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी धर्मादाय सह आयुक्त म. ला. जोगी, धर्मादाय उप आयुक्त प्रणिता श्रीनिवार, सहाय्यक धर्मदाय आयुक्त अनामिका मातोळे - पोरे, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते.