महत्वाची बातमी ! आता फोन पे, क्रेड ॲपवरून भरता येणार नाही क्रेडिट कार्डचे बील; 'हे' आहे कारण
महत्वाची बातमी ! आता फोन पे, क्रेड ॲपवरून भरता येणार नाही क्रेडिट कार्डचे बील; 'हे' आहे कारण
img
Dipali Ghadwaje
मुंबई : आरबीआयने क्रेडिट कार्ड्सचे  बील भरण्यासंदर्भात नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार क्रेडिट कार्ड्सचे बील हे आरबीआयच्या बीबीपीएस या प्राणालीच्या माध्यमातूनच भरावे लागणार आहे. 

त्यामुळे या नव्या नियमाचा परिणाम फोन पे, क्रेड, बीलडेस्क, इन्फिबिन यासारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे. हा नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच 30 जूननंतर वर नमूद केलेल्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बील देताना अडचण येऊ शकते. कारण 30 जूननंतर सर्व क्रेडिट कार्ड्सचे पेमेन्ट फक्त भारत बील पेमेन्ट सिस्टिम (बीबीपीएस) च्या माध्यमातूनच दिले जावेत, अशी सूचना याआधीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली होती. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय या बँकांनी अद्याप बीबीपीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही. या बँकांनी आतापर्यंत पाच कोटींपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना दिलेले आहेत. त्यामुळे फोन पे, क्रेड  तसेच अन्य ॲप्सवरून या बँकांच्या क्रेडिट कार्डचे बील भरताना अडचण येऊ शकते. जोपर्यंत या बँका बीबीपीएस प्रणाली सक्रिय करणार नाहीत, तोपर्यंत वर नमूद केलेल्या ॲप्सच्या मदतीने क्रेडिट कार्ड्सचे बील भरता येणार नाही.   

आणखी 90 दिवसांचा वेळ देण्याची मागणी

दरम्यान, हा नियम शिथिल करून बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एकूण 34 बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे. पण आतापर्यंत यातील फक्त 8 बँकांनी बीबीपीएस ही प्रणाली सक्रिय केलेली आहे. बीबीपीएस प्रणाली सक्रिय असलेल्या बँकांमध्ये एसबीआय कार्ड, बीओबी कार्ड, इंडसइंड बँक, फेडरल बँक, कोटक बँक, महिंद्रा बँक या बँकांचा समावेश आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group