रिझर्व्ह बँकेनं सामन्यांना दिलासा दिलाय. आज पुन्हा एकदा रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली. यानंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. या कपातीनंतर पुन्हा एकदा कर्जाचे ईएमआय कमी होणार आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत सामान्यांना दिलासा देत रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा रेपो दर कमी करून रिझर्व्ह बँकेनं सामन्यांना दिलासा दिलाय. ट्रंम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांदरम्यान रिझर्व्ह बँकेचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करून दिलासा देण्यात आला होता.
७ ते ९ एप्रिलदरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. एमपीसीने सध्याचा महागाई दर उद्दिष्टापेक्षा कमी असल्याचं मान्य केलं. बैठकीतील सर्व सदस्य दरात कपात करण्याच्या बाजूनं होते. आरबीआयनं आपली भूमिक न्यूट्रलवरून अॅकोमोडेटिव्ह अशी केली आहे. यापूर्वी आरबीआयने फेब्रुवारीमहिन्यात व्याजदरात कपात केली होती. त्यावेळी व्याजदर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणण्यात आला होता. ही कपात पूर्ण ५ वर्षांनंतर करण्यात आली.
एमएसएफ आणि एसडीएफच्या दरातही कपात आरबीआयने एमएसएफ आणि एसडीएफच्या दरात कपात करण्याची घोषणा केली. एमएसएफ दर ०.२५% ने कमी होऊन ६.२५% झाला, तर एसडीएफ दर ०.२% नं कमी होऊन ५.७५% झाला. आपल्या भाषणादरम्यान आरबीआय गव्हर्नरांनी आर्थिक वर्ष २०२६ ची सुरुवात चिंताजनक पद्धतीनं झाल्याचं म्हटलं. टॅरिफ वॉरमुळे अनिश्चितता वाढली आहे. टॅरिफ वॉरमुळे कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. मात्र, अनिश्चित वातावरणात भारताची स्थिती स्थिर आहे. जागतिक तणावाच्या काळात धोरणात्मक आराखड्याने परिस्थितीचा समतोल साधला असल्याचंही मल्होत्रा म्हणाले.
बँक ऑफ अमेरिका (BofA) ग्लोबल रिसर्चनुसार, एप्रिलमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की आरबीआय रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्स (०.२५%) कपात करून तो ६% पर्यंत आणू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच पुढील काही महिने महागाई ४ टक्क्यांच्या खाली राहण्याची शक्यता असून रुपयावरील दबाव कमी होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांवर टॅरिफ लागू केलं आहे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होणार आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक मंदी येण्याची अपेक्षा भीती व्यक्त करण्यात येतेय. अमेरिकेमध्ये याविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ हट्टामुळे अमेरिकेच्या बाजारामध्ये मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही घसरण झालेली दिसून आली. याशिवाय चौथ्या तिमाहीची कंपन्यांच्या निकालाची आकडेवारी जाहीर होण्यास प्रारंभ होणार आहे. त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.