रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला स्फोटकांनी उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा हा ईमेल गुरूवारी दुपारी आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ही माहिती उघड झाली. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी असणारा हा ईमेल रशियन भाषेत होता. याआधीही रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातही आरबीआयला धमकी मिळाली होती.
गेल्या काही महिन्यांत धमकीच्या कॉल्सची संख्या सतत वाढली आहे. कधी शाळेत धमकीचे कॉल येतात तर कधी फ्लाइटमध्ये धमकीचे कॉल मिळत आहेत. विमानं बॉम्बने उडवून देण्याच्या शेकडो धमक्या आत्तापर्यंत मिळाल्या आहेत तसेच काही शाळांनाही अशीच धमकी मिळाली. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. तर आता आरबीआयलाही अशीच धमकी मिळाल्याने चिंतेंचे वातावरण आहे.