एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी (LPG) रीफिल बुकिंगच्या नियमात सुधारणा करत दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर ४५ दिवसांवरून घटवून २५ दिवस केले आहे. ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना ४५ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेतून मुक्ती मिळाली असून, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
केंद्र सरकारनं तेल विपणन कंपन्यांना म्हणजेच ऑईल मार्केटिंग कंपन्यांना ग्रामीण भागातील एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या कालवाधीमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. आता शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना सिलेंडर बुकिंग 25 दिवसानंतर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा
सुरेश गोपी हे केंद्रीय मंत्रिमंडळात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. केंद्र सरकारनं अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या काळात मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल राहावा यासाठी ग्रामीण भागात गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 45 दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. ग्रामीण भागातील ग्राहक 45 दिवसानंतर सिलेंडर बुकिंग करु शकत होते. तर, शहरी भागातील एलपीजी ग्राहक 25 दिवसानंतर बुकिंग करु शक होते.
पेट्रोलियम मंत्रालयानं 7 सप्टेंबर म्हणजेच आजच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपन्यांच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिलं आहे. एलपीजी पुरवठ्यामध्ये वाढ झाल्यानं आणि सिलेंडर रिफील संदर्भातील स्थिती सुधारल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्याची एलपीजी पुरवठ्याची स्थिती लक्षात घेता, रिफील संदर्भातील अनुशेष कमी झाल्यानं ग्रामीण भागातील सिलेंडर रिफीलसाठीचा कालावधी 25 दिवसांवर आणावा असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील एखाद्या ग्राहकानं महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडर बुक केल्यानंतर आणखी एकदा सिलेंडर बुकिंग करायचा असेल तर त्याच महिन्यात 26 तारखेला सिलेंडर बुक करता येऊ शकतो.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता तेव्हा एलपीजी पुरवठ्याचं संकट निर्माण झालं होतं. तेव्हा सरकारनं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावलं उचलली होती. त्यापैकीच एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगसाठी काही दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. ग्रामीण भागासाठी 45 दिवस तर शहरी भागासाठी 25 दिवसांची अट घालण्यात आली होती . आता ग्रामीण आणि शहरी भागात देखील गॅस सिलेंडर बुकिंसाठी 25 दिवस थांबावं लागेल.
दरम्यान, केंद्र सरकारनं एलपीजीला पर्याय म्हणून विविध शहरांमध्ये पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला होता. देशातील विविध शहरांमध्ये ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आणि एलपीजी कनेक्शन असेल त्यांना एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले होते.