देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो. या दोन्ही राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे. अशातच साखरेने ऑक्टोबर 2017 नंतरचा सर्वोच्च दर गाठला आहे. साखरेच्या दरात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केलीय.
पीक हंगाम 2023-24 मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्यास साखर आणखी महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतात, खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.
दरम्यान, साखरेचे दर असेच वाढत राहिले, तर केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही घेऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. निर्यातबंदी केल्यास देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती कमी करता येतील. साखरेचा साठा कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांत साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन सरकार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शेतीमालाचे दर पाडण्यासाठी निर्णय घेत आहे. यामध्ये टोमॅटो, कांदा, तांदूळ या शेतमाल उत्पादकांना फटका बसला आहे. आता साखरेचे भाव पाडण्यासाठी साखरेवर साठे मर्यादा लावण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत.