केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत ऊसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंबंधीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. यामुळे घरगुती बाजारपेठेतील साखरेचा तुटवडा पूर्ण होईल. सरकार बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करणाऱ्यांना रोखू शकतं. सी-हेवी इथेनॉलवर बंदी नाही.
सध्या देशात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.
दरम्यान, याबबात ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील साखरेचे उत्पादन, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवतो. ज्यामुळं स्थिर किंमतीवर साखरेची उपलब्धता सुनिश्चित होते.
सरकारनं 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. परंतु बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. या निर्णयाबाबत मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयालाही कळवले आहे.