हिंगोली : शेतकऱ्यांसाठी सरकारने पीक विमा योजना सुरु केली आहे. जेणे करून पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. दरम्यान खरीप हंगामासाठी पीक विमा काढला जात आहे. यासाठी कृषी विभागाकडून देखील आवाहन केले जात आहे.
मात्र विमा काढता येत नसल्याने शेतकरी संतप्त असून हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी आज पिक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करत हनुमाननगर परिसरात खाजगी जागेत असलेलं पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड केली आहे.
नवीन खरीप हंगाम सुरु झाल्याने या खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या वतीने पिक विमा भरणे सुरू आहे. मात्र पीक विमा कंपनीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांचा पिक विमा भरला जात नाही. या समस्येचे निरासन व्हावे, यासाठी शेतकरी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र विमा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्यांनी खुर्च्या व फर्निचरची तोडफोड करत नासधूस केली. तसेच पिक विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रोष पाहून पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला आहे.