मुंबईत पाच दिवस उपोषण केल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश आले. आरक्षण मिळाल्यानंतर सर्वच आपापल्या घराकडे निघाले. मात्र यातील एका आंदोलकावर काळाने घाला घातला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा येथील मराठा आंदोलक रेल्वेतून खाली पडल्यामुळे आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वसमत तालुक्यातील बोराळा येथील 50 वर्षीय गोपीनाथ सोनाजी जाधव हे आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या सभांनाही त्यांचा सक्रिय सहभाग राहत होता. मराठा आरक्षण मिळालेल्या आनंदात विजयी रॅलीत आनंदाने सहभागी झाल्यानंतर आझाद मैदानावरुन रेल्वेने वाशीकडे परतत असताना सानपाडा स्थानकाजवळ गर्दीत रेल्वेतून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.
दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूला दुखापत झाली असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र उपचारादरम्यान त्यांचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.