छोठ्या मोठ्या संघटनांना एकत्र करणार, विधानसभेला नवीन पर्याय देणार, राजू शेट्टींचा एल्गार
छोठ्या मोठ्या संघटनांना एकत्र करणार, विधानसभेला नवीन पर्याय देणार, राजू शेट्टींचा एल्गार
img
Dipali Ghadwaje
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच छोठ्या मोठ्या संघटनांना एकत्र करुन नवीन पर्याय उभा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली. राजू शेट्टी यांनी आज परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या विधानसभेत नवीन पर्याय देणार असल्याचे सांगितले.  

राजू शेट्टी हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 15 जुलैपासून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीसाठी कर्जमुक्ती अभियानाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. महायुती सरकार असो किंवा महाविकास आघाडी सरकार असो हे दोघेही शेतकरी विरोधी असल्याचे शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांना न्याय यांच्याकडून मिळत नाही शेतीमालाला भाव मिळत नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडी किंवा महायुती असो या दोघांनीही राज्यातील चळवळीशी निगडित असलेल्या छोट्या पक्षांना संपविण्याचेच काम केले आहे.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समविचारी संघटना पक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, या संदर्भात सध्या महाराष्ट्रभर फिरुन अशा संघटनांसोबत चर्चा केली जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. कालच छत्रपती संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समितीचे केशवांना धोंडगे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या संबंधित असलेले पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले.

22 ऑगस्टला शेगाव येथे या सर्व छोट्या-मोठ्या संघटना आणि पक्षांची एकत्रित बैठक संपन्न होणार आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. 
 
दरम्यान ते म्हणाले की बच्चू कडू देखील आमच्यासोबत आले तर आम्हाला काहीही हरकत नाही. कालच राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. याविषयी विचारले असता चळवळीशी निगडित असलेल्या समविचारी छोट्या पक्षांना आम्ही सोबत घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार आहोत. या संदर्भात आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group