लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गजांचा पराभव झाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र राज्यात जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे, राज्यात सर्वच प्रमुख पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे,
अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही प्रवेश सुरू आहेत, पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नगरसेवक रवी लांडगे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ते ‘मातोश्री’च्या दिशेनं रवाना झाले आहेत. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन करत लांडगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी रवी लांडगे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपच्या स्थानिक आमदारांच्या भ्रष्ट कारभारामुळे शिवसेना ठाकरे गटात दाखल होत असल्याचं रवी लांडगे यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.